मुंढेकरवाडी सेवा संस्थेची 23 एप्रिल रोजी पुन्हा निवडणूक
By : Polticalface Team ,27-03-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंढेकरवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक 23 एप्रिल रोजी एक वर्षानंतर पुन्हा निवडणूक होत आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र घोडके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 13 जागेसाठी होणाऱ्या निवडणुकी दरम्यान 20 मार्च 2023 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून, 28 मार्च 2023 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. तर 29 मार्च ते 12 एप्रिल 2023 रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेले असून, या संस्थेची निवडणूक पुन्हा अटीतटीची होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान ५ मार्च 2022 रोजी या संस्थेची निवडणूक घेण्यात आली होती त्यावेळी मोठ्या अटीतटीची निवडणूक पार पडली. अनेक वर्षे ही संस्था पाचपुते गटाकडे होती. मात्र गेल्या वर्षी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. त्यामध्ये नागवडे गटाने या अटीतटीच्या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उमेदवार उभे केल्याने सहा उमेदवार या निवडणुकीत विजय मिळवत आमदार पाचपुते गटाला सत्ता काबीज करण्यापासून या निवडणुकीत थोपवले. त्यावेळी नागवडे पाचपुते गट आमने-सामने उभे होते त्यावेळी निवडणुकीत नागवडे गटाचे सहा तर पाचपुते नहाटा गटाचे सहा असे समसमान उमेदवार निवडून आल्याने त्याचा परिणाम अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीवर होताना दिसला. मागील निवडणुकीत विजय झालेले उमेदवार यांनी आपापल्या नेत्यांवर ठाम विश्वास ठेवत जागा सोडली नाही. अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीवर मोठा पेज निर्माण झाला होता. निवडणूक झाल्यानंतर सहकार कायद्यानुसार सहा महिन्याच्या आत अध्यक्ष -उपाध्यक्ष न निवडल्यास सहकार क्षेत्रातील संस्थेमधील कार्यरत अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक करता येते. असा सहकार खात्याचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून सहा महिने मागील निवडून आलेल्या उमेदवारांमधून अध्यक्ष -उपाध्यक्ष न निवडल्यामुळे अखेर श्रीगोंद्याच्या सहाय्यक निबंधकांनी जिल्हा बँकेतील अनुभवी अधिकारी बाळासाहेब उंडे यांची या संस्थेवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सेवा संस्थेवर प्रशासक म्हणून जिल्हा बँकेतील शाखा अधिकरी बाळासाहेब उंडे यांनी संस्थेची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल एक वर्ष या संस्थेचा उत्तम प्रकारे पारदर्शी व काटकसरीने कारभार पाहून संस्थेची मागील सन 2021 22 आर्थिक वर्षातील शंभर टक्के कर्ज वसुली करून एक प्रकारे इतर समस्यांपुढे एक मोठा आदर्श श्री उंडे यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे तालुक्यातून अनेकांनी कौतुकही केले. या संस्थेचे जवळपास 1008 सभासद असून 23 मार्च 2023 रोजी होणाऱ्या या निवडणुकीत संस्थेचे मतदार कुणाच्या? बाजूने कौल देणार? हे आता 23 एप्रिल रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी नागवडे -पाचपुते गटाची या संस्था निवडणुकीत रणनीती कशी असणार आहे. मागील संस्था निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देणार की? नवीन चेहऱ्यांना संधी देणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, 12 एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेण्याची अखेरची तारीख असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने या संस्थेच्या निवडणुकीत मोठी पुन्हा रंगत येणार असल्याचे दिसून येत आहे.
वाचक क्रमांक :