By : Polticalface Team ,09-04-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या सन 2002 -03 या बॅचचा स्नेह मेळावा उत्साही वातावरणात संपन्न झाला. विशेष म्हणजे पारगाव सुद्रिक या गावची यात्रा आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा दुग्ध शर्करा योग विद्यार्थ्यांनी याप्रसंगी घडवून आणत, गुरु शिष्यांनी एकमेकांच्या भेटी दरम्यान जुन्या आठवणींना शालेय जीवनातील आठवणी द्वारे उजाळा देण्याचा प्रयत्न माजी विद्यार्थी व शिक्षकांनी याप्रसंगी केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलकाताई दरेकर या होत्या.
दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पाचवी ते दहावीपर्यंत ज्ञानदानाचे काम करणाऱ्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात या विद्यालयात मिळालेले शिक्षण व संस्काराचे धडे शालेय शिस्त या पंचतत्वे सूत्रांमुळे आमचे जीवन प्रफुल्लित होऊन आम्हाला आमच्या जीवनाला एक प्रकारे संजीवनी मिळाली असे सांगत याप्रसंगी अनेकांनी शालेय जीवनात शिक्षण घेत असताना शिक्षकांकडून मिळालेली आदर युक्त भावना भरीव ज्ञान व त्या ज्ञानाच्या शिदोरीवर आमचे जीवन प्रफुल्लित झाल्याच्या भावना यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी आशा घोडके या माजी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे की, शिक्षकांचे शालेय जीवनातील मार्गदर्शने हे किती महान व अनमोल असते. हे मला शिक्षक झाल्यानंतर समजले. मला या विद्यालयातूनच खऱ्या अर्थाने चांगले ज्ञानामृत मिळाले. त्यामुळे मी देखील उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करते असे सांगितले.
याप्रसंगी या विद्यालयाचे माजी शिक्षक जनार्धन जायकर यावेळी म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतरही अनेक माजी विद्यार्थी भेटतात. उच्च पदस्थ होऊन विविध क्षेत्रात नोकरी करतात. हे ऐकून मनस्वी समाधान लाभले. आम्ही देखील ज्ञानदानाचे काम करत असताना विद्यार्थी हाच केंद्रबिंदू म्हणून विद्यार्थ्यांना शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच शिस्त व संस्काराचे योग्य धडे देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात काम करताना पुढे वैवाहिक जीवनानंतर आपले सासू, सासरे, पती आणि आई वडील यांच्या बद्दल आदरयुक्त भावना सतत अंगी ठेवावी. असे सांगून विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात जायकर यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयाचे सोपानराव लाढाणे, शहाजी कुतवळ, राजेंद्र कळसकर, राजेंद्र हिरवे, मच्छिंद्र मडके पाटील, जनार्धन जायकर, उषाताई शेजुळ मॅडम, चंद्रभागा रासकर, वसंतराव मोरे, बबनराव गोरे, दत्तात्रेय सस्ते, बाबा लष्कर, कैलास जगताप आदींसह मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर आपल्या अध्यक्ष भाषणातून यावेळी शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाल्या की, आजचा दिवस आमच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण समजते. असे सांगून त्यापुढे म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी 2002-० 3 या शैक्षणिक वर्षातील अध्यापन करत असलेल्या माजी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील निमंत्रित करून प्रेम व्यक्त केले त्याबद्दल समाधान व्यक्त केले. वीस वर्षानंतर विद्यार्थी शिक्षकांची भेट ही अनमोल भेट समजले जाते पैशापेक्षा आमची खरी संपत्ती विद्यार्थी आहे पूर्वी जुनी शिक्षण पद्धत म्हणजे "छडी वाजे छम छम विद्या येई गम गम" या म्हणीप्रमाणे पूर्वी खरी शिक्षणाची ती शिक्षा होती. यापुढे आपल्या कोणत्याही सहकार्यावर वाईट प्रसंग असो, त्यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. आई वडील आणि शिक्षकांचा आदर ठेवावा. प्रत्येकामध्ये एक तरी चांगला गुण असतो. त्यामुळे आपण गुणी विद्यार्थी आहात गुरु शिष्याचे नाते जोपासले त्याबद्दल श्रीमती दरेकर यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
यावेळी पत्रकार नंदकुमार कुरुमकर, विलास साळवे, बापू फराटे आदींसह आजी माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सुनील जगताप, सचिन जायकर, मंगेश घोडके, विनोद हिरवे, उमेश बोरुडे, तेजस्विनी फंड, शैला लवंगे, विजय जगताप, प्रशांत इथापे ,गणेश घोरपडे, रविकिरण खेतमाळी आदी माजी विद्यार्थ्यांनी मोठे परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मंगेश घोडके व शैला लवंगे यांनी केले तर आभार विजय जगताप यांनी मानले.
वाचक क्रमांक :