श्रीगोंदा प्रतिनिधि :-
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गावठी कट्टा प्रकरणात अटक आसलेला आरोपी पुणे येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची घटना शनिवार दि.२२ रोजी घडली. फरार आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी रविवार दि.२३ रोजी सकाळी श्रीगोंद्यात पुन्हा अटक करण्यात आली. दरम्यान, अटकेतील आरोपी पळल्याने पोलिसांची पुरती नाचक्की झाल्याची चर्चा रंगली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीला दोन आठवड्यांपूर्वी एका गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. परंतु, त्याच्या वकिलांनी संबंधित आरोपी मनोरुग्ण असल्याचे न्यायालयात सांगितल्याने त्याला बुधवारी(दि.१९) पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. तरीही काल(दि.२२) सायंकाळी उपचार सुरू असताना संबंधित आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातुन पळून गेला. आरोपी पळून गेल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. ही घटना त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कळवली. त्यानंतर संबंधित आरोपीची दुसऱ्यांदा शोधमोहीम सुरू झाली. आज सकाळी त्याला तालुक्यातील पोईफाटा परिसरातुन पुन्हा अटक करण्यात आली. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती समजली.
वाचक क्रमांक :