भावडीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,07-06-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी:-
श्रीगोंदा तालुक्यातील भावडीच्या सरपंच धनश्री अर्जुन करनोर आणि ग्रामसेवक आतीष दादासाहेब आखाडे यांच्या विरोधात सुमारे २१ लाख २३ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर यांच्या आदेशावरून विस्तार अधिका-यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भावडी येथे नव्यानेच अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी चौकशीचे आदेश दिले. श्रीगोंदा पंचायत समितीचे गटविकास अधिका-यांनी सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सदर तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीसाठी मार्च महिन्यात उपस्थित राहण्याचे कळविण्यात येऊनही चौकशीकामी सहकार्य केले नाही. त्यामुळे पुन्हा एप्रिल महिन्यात नोटीस बजावण्यात आली. परंतु, त्यानंतरही ग्रामपंचायतीचे नमुना १ ते ३३ तसेच विहीत विकास कामांच्या निविदा नस्ती, मूल्यांकन, काम पूर्णत्वाचे दाखले इत्यादी दप्तर उपलब्ध करुन दिले नाही. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचा अवमान करुन प्रशासकीय कामात अडथळा निर्माण केला. एप्रिल महिन्यात पुन्हा नोटीस बजावण्यात आल्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी खुलासा केला. परंतु, कोणतीच कागदपत्रे सादर केली नाहीत.
त्यानंतर चौकशी समितीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या शासकीय बँक खात्याची माहीती बँक ऑफ महाराष्ट्र श्रीगोंदा शाखेकडून घेतली.
त्यावरून ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी, १४ वा आणि १५ वा वित्त आयोग निधीतून वेळोवेळी २१ लाख तेवीस हजार तीनशे बावन्न रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले.
सदर रक्कम खर्च केल्याबाबतची आवश्यक कागदपत्र सादर न केल्याचे चौकशी समितीने सदर अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना सादर केला. त्या अहवालावरून सरपंच धनश्री अर्जुन करनोर आणि ग्रामसेवक आतीष दादासाहेब आखाडे यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरीष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार विस्तार अधिकारी पोपट शहाजी यादव यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
वाचक क्रमांक :