श्रीगोंदा प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील दाखल किरकोळ गुन्ह्यात मदत करण्यासाठी 4000 ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावून एका पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. परंतु पथकाची चाहूल लागताच या पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातून धूम ठोकली.त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेलवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे याने भा.द.वि. कलम 324,323,504,506,34 या गुन्ह्यात जामीनकामी मदत केल्याबद्दल 10 हजार लाचेची मागणी केली असल्याची तक्रार अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पथकाने दि 21 रोजी बेलवंडी पोलीस ठाण्यात सापळा लावला. सायंकाळी 5 च्या सुमारास ज्ञानेश्वर पठारे याने पंचासमक्ष 4000 लाचेची मागणी केली. ही रक्कम पंचासमक्ष पोलीस ठाण्यातील पाठीमागील खोलीत असलेल्या कपाटात ठेवण्यास सांगून स्वीकारली. परंतु हा ट्रॅप असल्याचे लक्षात आल्यावर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातून पलायन केले. लाचलुचपत पथकातील अधिकाऱ्यांनी पाठलाग केला पण पोलीस कर्मचारी शेजारीच असणाऱ्या उसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाला.
त्यानुसार पोलिस हवालदार ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 229/2023 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलीस अमलदार कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनर यांच्या पथकाने केली आहे.
वाचक क्रमांक :