लिंपणगावच्या सरपंच सौ शुभांगीताई जंगले यांचा राजीनामा
आता नूतन सरपंच कोण ?चर्चेला उद्यान
By : Polticalface Team ,02-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजले जाणाऱ्या लिंपणगाव येथील सरपंच सौ शुभांगीताई जंगले यांनी नुकताच आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान 2021 रोजी ग्रामपंचायतची निवडणूक झाली. त्यावेळी त्यांची गावच्या सरपंचपदी निवड झाली. अडीच वर्ष त्यांनी सरपंचपदाची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळली. त्यांनी अचानक आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर गावात चर्चेला मोठे उद्यान आले आहे. विशेष म्हणजे महिला सरपंच असताना 17 सदस्यांना बरोबर घेऊन प्रत्येक वार्डमध्ये सर्व समावेशक अशी विकास कामे पार पाडण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. लिंपणगावच्या आतापर्यंतच्या इतिहासात स्वतःहून सरपंच पदाचा राजीनामा देणाऱ्या सौ जंगले ह्या पहिल्या सरपंच ठरल्या आहेत. कारण पाठीमागील दहा वर्षाचा गावचा इतिहास पाहिल्यानंतर एक वर्ष ते सहा महिने साधारणता सरपंचांना काम करण्याची संधी मिळाली. ठरल्याप्रमाणे राजीनामा न दिल्यास सदस्यांनी अविश्वास ठराव द्वारे त्या सरपंचांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला. परंतु विद्यमान सरपंच सौ शुभांगीताई जंगले या गावच्या इतिहासामध्ये पहिल्याच स्वतःहून राजीनामा देणाऱ्या सरपंच ठरल्याने राजीनामा का दिला? ठरल्याप्रमाणे दुसऱ्याला संधी देण्यासाठी हा राजीनामा दिला काय? याविषयी देखील ग्रामस्थांमधून तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे.
दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव समजले जाते. गावचा विस्तार हा गाव आणि सहा वाड्या मिळून ग्रुप ग्रामपंचायत मार्फत गावचा कारभार पाहिला जातो. गावची एकूण लोकसंख्या साधारणता 18 ते 19 हजार दरम्यान आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक वित्त आयोगातून ग्रामपंचायतला कोट्यावधीचा निधी दरवर्षी मिळतो. त्यातून प्रभाग नुसार निधीचे समान वाटप करत विकास कामे मार्गी लावली जातात. त्यामुळे गावच्या सरपंचासह प्रत्येक सदस्याची देखील तितकीच जबाबदारी वाढलेली असते. अशा परिस्थितीत सर्व सदस्यांना सामावून घेऊन विकास कामे मार्गी लावण्यासाठी सरपंचांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे महिला सरपंच म्हणून सौ जंगले यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत उत्तम प्रकारे कामकाज हाताळले. दोन दिवसापूर्वी त्यांनी श्रीगोंद्याच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे स्वतःहून राजीनामा दिल्याने नूतन सरपंच कोण होणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, नियमानुसार आता गटविकास अधिकारी गावचा नवीन कारभारी निवडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक आयोजित करतील. आणि त्यावेळेस पुढील सरपंच कोण? हे घोषित करतील.
गावच्या हितासाठी स्वतःहून सरपंच पदाचा राजीनामा दिला सरपंच सौ शुभांगी ताई जंगले
याबाबत गावच्या सरपंच सौ शुभांगीताई जंगले यांना राजीनामा विषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, आपण स्वतःहून सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याविषयी कोणत्याही सदस्यांचा रोष नव्हता परंतु पंचायत राजचा कारभार पाहण्यासाठी दुसऱ्या संधी मिळावी. हा हेतू आपला आहे. महिला सरपंच म्हणून अडीच वर्षे काम पाहताना सर्व सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी देखील विकास कामे मार्गी लावताना वेळोवेळी मौलिक सूचना व सहकार्य केले असे सांगितले. तर पुढील सरपंच कोण? याविषयी पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या की ,ते सतरा सदस्य मासिक मीटिंग आयोजित केल्यानंतर कळेल असे सांगितले.