सहकार महर्षी नागवडे कारखान्याचा चालू गळीत हंगामाचा ऊस दर कमीत कमी 2900 प्र.मे राहणार अध्यक्ष राजेंद्र नागवडे
By : Polticalface Team ,04-11-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-- 24 या चालू गळीत हंगामाचा ऊस दर हा कमीत कमी 2900 रुपये प्र.मे.टन राहणार असून त्यापैकी पहिला हप्ता रुपये 2500 प्र. हे. टनाप्रमाणे देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिलेला नाही. सातत्याने चांगला ऊस भाव देऊन सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षीची एफ आर पी पूर्ण करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणेकरीता 75 रुपये प्र. मे. टनाप्रमाणे पाच कोटी चे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करीत आहोत. त्याचप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त सवलतीचे दरात गटवार साखर विक्री सुरू केलेली असून कारखाना साइटवर रिटेल साखर विक्री केंद्र सुरू करून ग्राहकांना टेंडर दरानुसार 50 किलोचा कट्टा विक्री सुरू केलेले आहे.
स्व. बापूंच्या विचार प्रेरणेस अनुसरून चालू गळीत हंगामात गणितास येणाऱ्या उसाला कमीत कमी 2900 प्र. हे. टनाप्रमाणे ऊस दर अदा करणार आहोत. त्यापैकी पहिला हप्ता रुपये 2500 प्र. मे. टनाप्रमाणे देण्यात येणार आहे जर उद्दिष्टापेक्षा जादा गाळप झाले तर शेतकऱ्यांना त्याहीपेक्षा जादा भाव देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी तालुक्यातील काही खाजगी कारखान्यांनी अनेक वेळा ऊस दराबाबत अनेक प्रलोभने दाखविली होती परंतु त्याची पूर्तता केली नाही नागवडे कारखान्याने मात्र सातत्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस दर व इतर पूर्तता केलेली असून सभासद व ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केलेला आहे.
तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांनी ऊस भावाबाबत कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न ठेवता नागवडे सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे करिता सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्य यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :