By : Polticalface Team ,11-02-2024
श्रीगोंदा (प्रतिनिधी) श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मुलींसाठी निर्भय कन्या अभियान कार्यशाळा उत्साहात दिनांक ८ व ९ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. याप्रसंगी डॉ. नितीन खामकर, प्रा.डॉ. सविता लोखंडे, कराटे प्रशिक्षक श्री.जयेश आनंदकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दि. ८ फेब्रुवारी रोजी कराटे प्रशिक्षक श्री जयेश आनंदकर सर यांनी विविध प्रात्यक्षिकांसह विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. दि. ९ फेब्रुवारी रोजी निर्भय कन्या अभियान अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या व्याख्यानाचे पुष्प गुंफण्यासाठी डॉ. नितीन खामकर यांनी महिलांचे स्वास्थ्य या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले मुलींनी आपल्या रोजच्या आहारातील सकस आहाराचे महत्व, पहाटे लवकर उठणे, व्यायाम करणे, दैनंदिनी कामाची नियमितता ठेवणे याबाबत माहिती दिली. आरोग्यम् धनसंपदा या उक्तीप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या व्याख्यानाचे पुष्प प्राध्यापिका डॉ. सविता लोखंडे यांनी गुंफले, यावेळी बोलताना त्यांनी महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर आपले मत मांडले यात महिलांचा व्यक्तिमत्व विकास साधताना त्यांनी व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक गोष्टींना प्राधान्य देणे, वेळेचे महत्व, आपले सर्व काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे, व्यक्तिमत्व विकास साधताना पंचसूत्र नुसार कसे नियोजन करावे याबाबत मत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी भूषविले.
तसेच सर्व महिला प्राध्यापिकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले. तसेच या कार्यक्रमास डॉ.धर्मनाथ काकडे, प्रा.सतीश चोरमले, प्रा.शंकर गवते उपस्थित होते. महाविद्यालयातील मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.भोस मुकुंद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.प्रविणकुमार नागवडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक :