By : Polticalface Team ,15-02-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणे तसेच सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय दि.०२.०३.२०१९ रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत, दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत या विभागाच्या उपरोक्त विषयावर मा. मंत्रीमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
१. वित्त विभागाच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दि.०१.१०.२००६ पासून लाभ देतांना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे.
२. वित्त विभागाच्या दि.०२.०३.२०१९ शासन निर्णयानुसार तीन लाभाच्या (१०:२०:३०) सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दि.०१.०१.२०१६ पासून लाभ देतांना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे.
या निर्णयामुळे अंदाजे रु.२२,७९,०९,११६/- (रुपये बावीस कोटी एकोणऐंशी लक्ष नऊ हजार एकशेसोळा) इतका अनावर्ती खर्च आणि अंदाजे रु.३,६१,९२,०००/- (रुपये तीन कोटी एकसष्ट लक्ष ब्याण्णव हजार) इतका वार्षिक आवर्ती खर्च अपेक्षित आहे. वित्त विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे
या वरील प्रलंबित प्रश्नसंदर्भात राज्य शिक्षकेतर महासंघाच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी सतत केलेल्या प्रत्यक्ष पाठपुराव्यामुळे राज्यातील शिक्षकेतर बांधवांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला 12, 24 आणि 10, 20, 30 च्या वेतनश्रेणीचा प्रश्न अखेर आज मिटला असून आज त्या राज्य मंत्रिमंडळात मान्यता देऊन येत्या 29 फेब्रुवारी 2024 रोजीच्या आत शासन निर्णय पारित होणार असल्याचे राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीकराव सुरासे राज्य समन्वयक एसडी डोंगरे राज्य सचिव श्री पाराजी मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
या निर्णयाबद्दल राज्यातील शिक्षकेतरांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या निर्णयाचे अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर महासंघाने स्वागत केले आहे
वाचक क्रमांक :