लिंपणगावमध्ये नियमित पाणी न सुटल्यामुळे महिलांचा ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव
By : Polticalface Team ,04-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजले जाणाऱ्या खुद्द लिंपणगावात सार्वजनिक विहिरीमध्ये पाणी असूनही पाणी सुटत नसल्याने गावच्या महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. दरम्यान महिलांचे म्हणण्यानुसार गावच्या सार्वजनिक विहिरींना मुबलक पाणी असताना वेळेत पाणी सुटत नाही, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांना देखील नादुरुस्त विद्युत पंप दुरुस्त करण्यास सांगूनही या विद्युत पंपाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे लिंपणगावच्या जवळपास नऊ महिन्यापासून पाण्यासाठी महिला व पुरुषांची मोठी भटकंती सुरू असून, आज सोमवारी चार मार्च रोजी महिलांनी गावच्या ग्रामविकास अधिकारी यांना घेराव घालून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी ग्रामपंचायतचे काही सदस्य देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगावला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंडेकरवाडी नजीक घोड कॅनॉलच्या च्या पायथ्याशी असणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीला मुबलक पाणी आहे परंतु तेथील विहिरीवरील विद्युत पंप गेल्या नऊ महिन्यापासून नादुरुस्त आहे. ग्रामस्थांनी या नादुरुस्त विद्युत पंपाची दुरुस्ती करून तातडीने गावाला पाणीपुरवठा सोडण्याची मागणी केली. परंतु ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ व महिलांनी केला आहे.
दरम्यान ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आता उन्हाळी हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीला लिंपणगावमध्ये दोन सार्वजनिक विहिरी असून सिद्धेश्वर मंदिरालगत एक सार्वजनिक विहीर तर दुसरी विहीर घोड कॅनॉलच्या पायथ्याशी आहे. या विहिरींना मुबलक पाणी आहे, परंतु विद्युत पंपा अभावी मात्र गावचा पूर्णतः पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप महिला व ग्रामस्थांमधून केला जात आहे. एक मार्चपासून घोड चे आवर्तन सुरू झालेले आहे. त्यातून सार्वजनिक विहिरीत पाणी सोडले जाते. परंतु तेथील विद्युत पंपच बंद असल्याने पाणीपुरवठ्याचा मोठा बट्ट्याबोळ झालेला आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतचे कार्यकारी अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी पाहिले जाते परंतु ग्रामविकास अधिकारी या पाणी प्रश्नासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने पाणी असून खोळंबा व नसून अडचण अशी स्थिती लिंपणगावची बनलेली आहे. त्यामध्ये आठ मार्च रोजी गावची महाशिवरात्र असल्याने ग्रामस्थ व महिलांना पाण्याची मोठी चिंता निर्माण झाली आहे. दोन दिवसात गावचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा गावातील प्रमुख महिला व ग्रामस्थांनी यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत सदस्यांनी देखील सार्वजनिक विहिरीवरील नादुरुस्त विद्युत पंप दुरुस्त करण्यासाठी वेळोवेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या परंतु सदस्यांना देखील ग्रामविकास अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने गावचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिकच तीव्र बनला आहे.
दरम्यान ग्रामस्थांचे म्हणण्यानुसार श्रीगोंद्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी लिंपणगाव या मोठ्या लोकसंख्येच्या गावाकडे किमान पाणी प्रश्न संदर्भात तरी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ग्रामस्थ व महिला पंचायत समितीच्या कार्यालयासमोर हंडा मोर्चा आणून आपल्या तीव्र भावना मांडणार आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लिंपणगावच्या पाणी प्रश्न संदर्भात आढावा घेऊन संबंधित ग्राम पंचायत प्रशासन व ग्रामविकास अधिकारी यांना तातडीने सूचना द्याव्यात अशी देखील मागणी ग्रामस्थ व महिलांमधून होत आहे.
वाचक क्रमांक :