By : Polticalface Team ,06-03-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंद्याच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे यांच्याकडून लिंपणगावच्या विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याची दखल घेत पाहणी केली. दरम्यान चार दिवसापूर्वी लिंपणगावच्या महिलांनी गावात वेळेत पाणी सुटत नसल्याने ग्रामपंचायतमध्ये येऊन ग्राम विकास अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. याबाबतचे सविस्तर वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर श्रीगोंदाच्या गटविकास अधिकारी श्रीमती फराटे यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांना गावात वेळेत पाणी सोडणेकामी योग्य त्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे यांनी बुधवारी सकाळी लिंपणगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या सार्वजनिक विहिरीवर समक्ष जाऊन गावच्या दोन्हीही विहिरींच्या पाण्याची चौकशी केली. यावेळी संबंधित ग्रामपंचायत च्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडून गटविकास अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. यावेळी पाणीपुरवठा संदर्भात माहिती देताना गटविकास अधिकारी श्रीमती फराटे मॅडम यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, सार्वजनिक विहिरी नजीक असणाऱ्या शेतकऱ्यांकडून नजरचुकीने पाईपलाईनची मोडतोड झाली होती. त्याची ग्रामपंचायतने तातडीने दुरुस्ती करून मुंडेकरवाडी नजीक घोड कॅनॉलच्या पायथ्याशी असणाऱ्या सार्वजनिक विहिरीवरील नादुरुस्त विद्युत पंप काही दिवसापूर्वी दुरुस्त करून गावाला तेथील विहिरीतून पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात आला. तसेच गावातील सिद्धेश्वर मंदिरालगत असणाऱ्या दुसऱ्या सार्वजनिक विहिरीची देखील गटविकास अधिकारी यांनी पाहणी केली, परंतु तेथील विद्युत पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा तो दुरुस्त करण्यात आला. तेथून देखील गावाला सुरळीत पाणीपुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे यांनी लिंपणगाव येथील पाणी प्रश्न संदर्भात निर्माण झालेला प्रश्न व ग्रामस्थ महिलांनी घेतलेली आक्रमक भूमिका याबाबत सत्य पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी गावात भेट दिली, असता ग्रामविकास अधिकारी मात्र अनुपस्थित होते. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ग्रामविकास अधिकारी हे बाहेरगावी असल्याचे गटविकास अधिकारी श्रीमती फराटे यांनी सांगितले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे यांनी लिंपणगावची लोकसंख्या मोठी असल्याने गावाला सार्वजनिक विहिरीतून वेळेत व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी उन्हाळी हंगाम लक्षात घेता गावात प्रत्येक चौकामध्ये ग्रामस्थांना वेळीच पाणी सोडण्यात यावे. नादुरुस्त विद्युत पंप वेळोवेळी तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठ्या संदर्भात कर्मचारी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे यांनी यावेळी उपस्थित संबंधित कर्मचाऱ्यांना केल्या. गटविकास अधिकारी श्रीमती फराटे मॅडम यांनी ग्रामस्थ व महिलांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने गावात सार्वजनिक विहिरींची पाहणी करून संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्याबद्दल ग्रामस्थ व महिलांनी गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे यांचे कौतुक केले आहे.
वाचक क्रमांक :