By : Polticalface Team ,17-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी).
तहसील कार्यालय, पंचायत समिती श्रीगोंदा व रयत संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात मतदार जागृती अभियान संपन्न करण्यात आले.
मतदार जागृती अभियानाच्या माध्यमातून मतदारांमध्ये देशाप्रती मताधिकार योग्य रीतीने बजावण्यासाठी जागृती घडून आणणे आवश्यक आहे आणि तेच या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी केले. 100% मतदान घडून आले तर खऱ्या अर्थाने देशाच्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व शंभर टक्के असेल असेही यावेळी ते बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी सांगितले, मतदारांपर्यंत जर पोहोचायचे असेल तर विद्यार्थी व शैक्षणिक संस्था हा प्रभावी मार्ग आहे या मार्गाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचून मतदारांमध्ये मतदान करणे विषयी प्रेरणा निर्माण करता येते.
यावेळी विद्यालयातील गुणवत्ता कक्ष प्रमुख सुधीर साबळे यांनी रयत संकुलातील एकूण तीन हजार विद्यार्थ्यांना समाजात जागृती करण्यासाठी शपथ दिली.
यावेळी मंचावर श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता चौधरी, उपमुख्याध्यापिका निलीमा कातोरे , पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे, विलास दरेकर, कैलास आठरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ ,सूत्रसंचालन दिलीप लबडे, तर आभार प्रदर्शन सचिन झगडे यांनी मानले.
वाचक क्रमांक :