श्रीरामपूर (प्रतिनिधी) ः अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून भाजपाचे खा.डॉ.सुजय विखे पाटील व महाआघाडीचे निलेश लंके यांच्यात लढत होणार असून घनशाम शेलार यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केल्याने मतदारांमध्ये मोठी विभागणी होणार आहे. त्यातच आता हिंदू एकता आंदोलन पक्षाने नगर दक्षिणमधून उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले असून या मतदारसंघात मोठ्या लढती पहावयास मिळणार आहे.
हिंदू एकता आंदोलन पक्षाची नुकतीच तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्षाचा उमेदवार दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात उभा करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरल्याने प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शितोळे हे कार्यकर्त्यांच्या उपस्थित लवकरच फॉर्म भरणार असल्याचे सांगण्यात आले. हिंदुत्व फक्त एकता आंदोलन पक्षाकडे राज्यात दिसत असल्याने गेली ३५ वर्षे महाराष्ट्रात पक्षाची बांधणी करून १२ जिल्हे व ४५ तालुक्यामध्ये या पक्षाची ताकद आहे. दोन दिवसांपूर्वी नगर, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत आणि पारनेर या मतदारसंघातून शितोळे यांनी दौरा केला असून त्यांना मोठा पाठिंबा दिसून येत आहे. यामुळे ही लढत आता बहुरंगी होणार असून जनतेचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. या बैठकीस संपूर्ण नगर जिल्ह्यातून पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचक क्रमांक :