By : Polticalface Team ,13-08-2024
नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी) नियमाची वारी करण्यापेक्षा प्रेमाची वारी करा; देवाचे नाम गोड आहे हे मुखाने घ्यावे; असा भावनिक सल्ला ह भ प सोपान महाराज सानप शास्त्री यांनी आयोजित काल्याच्या कीर्तनात बोलताना दिला.
लिंपणगाव तालुका श्रीगोंदा येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रामस्थ व सप्ताह मडळाने भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ६ ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने यावेळी आयोजित करण्यात आली होती. 13 ऑगस्ट रोजी या अखंड हरिनाम सप्ताहाची ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प सोपान महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
यावेळी उपस्थित भाविकांना उदबोधित करताना सानप महाराज यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक चढ-उतार उपस्थित भाविकांना सांगितले. उपस्थित भाविक देखील भावनिक होऊन गहिवरून आले. पुढे मार्गदर्शन करताना सानप महाराज म्हणाले की; श्रीकृष्णाच्या जन्मामुळे गोकुळातील सुखाला अंतपार नव्हता; नंदाच्या घरी बाळकृष्ण जन्माला आल्यामुळे सर्व नरनारींना आनंद झाला; सर्वांनी आपापल्या घरांवर गुडया; भगव्या पताका उभारल्या; दाराला चोरणे बांधले आणि आनंदाने हरिकथा करत हरी गुण गात होते. पुढे पौराणिक कथेत ची पार्श्वभूमी सांगताना सानप महाराज म्हणाले की; तुकाराम महाराज म्हणतात श्रीकृष्णाने सर्वांना आपल्या छंदात रंगवून टाकले आणि सर्वांना आपल्या रूपाने मोहून टाकले. या जगात गुणदोष सहीत माफ करणारी फक्त आईच आहे. तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्याकडे शास्त्रांच्या भाषांचा खजिना होता. सानप महाराज आणखी पुढे म्हणाले की; प्रत्येकाने दररोज परमेश्वराचे नामस्मरण करायला हवे; निश्चितपणे जीवनात उत्तम प्रकारे मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही असा भावनिक सल्ला देखील उपस्थित भाविकांना यावेळी सानप महाराज यांनी दिला.
सांगता समारंभ प्रसंगी सानप महाराज यांनी लिंपणगावच्या ग्रामस्थ व सप्ताह मंडळाचे भरभरून कौतुक केले. लिंपणगाव हे सर्वांच्याच नजरेत समृद्ध आहे. ग्रामस्थ दानशूर; ज्ञानी; गुणी; दयाळू आहेत. या गावची पौराणिक दृष्ट्या मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हेमाडपंथी मंदिर असणाऱ्या या श्री सिद्धेश्वर भगवंतांचे जागृत देवस्थान म्हणून सर्वश्रुत आहे. गावच्या सर्वच पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला बंधू भगिनींचे सिद्धेश्वरावर अपार असे प्रेम व श्रद्धा आहे. एकजुटीने अखंड हरिनाम सप्ताहासारखे सोहळे साजरे करून सार्वजनिक उत्सव निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरउद्गार सानप महाराज यांनी काढले.
या सप्ताह सोहळा प्रसंगी आमदार बबनराव पाचपुते; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; सौ डॉ प्रतिभाताई पाचपुते; s काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार; युवा नेते दिग्विजयसिंह नागवडे; विक्रमसिंह पाचपुते; भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते; ह भ प अविनाश महाराज साळुंखे आदी नेते व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळींनी देखील हजेरी लावून या धार्मिक श्रावणी सुखाचा लाभ घेतला. याप्रसंगी सप्ताह कालावधीत देणगीदार व अन्नदाते यांचा सप्ताहाचे मार्गदर्शक संजय महाराज गिरमकर यांनी यावेळी सन्मान केला. याप्रसंगी तालुक्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. आभार पोपट माने यांनी मानले.
वाचक क्रमांक :