By : Polticalface Team ,02-09-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना प्रत्येकाने आपले जीवन निष्कलंक जगावे; निश्चितच श्रद्धेने भक्ती केल्यास परमेश्वर देखील प्रसन्न होतो; असे विचार ह भ प श्रीनिवास महाराज बुगे यांनी आयोजित कीर्तन सोहळ्यात व्यक्त केले.
लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा येथील श्री व्यंकनाथ महाराज मंदिरात आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी २ सप्टेंबर रोजी या सप्ताह सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
यावेळी उपस्थित भाविकांना संबोधित करताना ह भ प बुगे महाराज म्हणाले की; देव हा सर्वांचा आहे; तो जगाचा पालन पोषण करणारा आहे. जेवढे तुम्ही परमेश्वराचे नामस्मरण चिंतन कराल; तितकेच भगवंत भक्ती रूपाने तुमच्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन सुखी व आनंदी राहण्यासाठी निष्ठा व श्रद्धेने परमेश्वराची भक्ती करावी; असे सांगून बुगे महाराज आणखी पुढे म्हणाले की; काला हे एकात्मतेचे प्रतीक आहे; त्यातून भक्तिमर्गाचा एक वेगळाच
आनंद मिळतो. पुढे बुगे महाराज यांनी म्हटले आहे की; स्त्रियांना समानतेची वागणूक मिळत नसल्यामुळे आज मुलींची संख्या कमी होताना दिसत आहे. हे वास्तव चित्र आज सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेक मुले बिगर विवाहाची राहतात. आणि हीच विवाहाची समस्या निर्माण झाल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या करू नये; ते मोठे पाप समजले जाते असा भावनिक संदेश देखील बुगे महाराज यांनी यावेळी उपस्थित भाविकांना दिला.
या सांगता सोहळ्याप्रसंगी लोणी व्यंकनाथ गावातील तरुणांनी मंदिरा सभोवताली आकर्षक अशी विद्युत रोषणाई केल्याबद्दल तुषार कोळपे; ईश्वर काकडे; रोहित खेतमाळीस निखिल खलाटे आदींचा यावेळी बुगे महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास लोणी व्यंकनाथ पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह ग्रामस्थ व महिला व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा व गणपतराव काकडे यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :