By : Polticalface Team ,27-09-2024
श्रीगोंदा (प्रतिनिधि) : निसर्गरम्य जुन्नरचे माजी सैनिक तसेच सध्या महाराष्ट्र वन खात्यात कार्यरत असणारे, पर्यावरणातील विशेष कार्याची दखल घेत "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद झालेले व्यक्तिमत्व, निसर्गसेवक, पक्षीमित्र, गडकिल्ले प्रेमी, शिवनेरी भुषण लेखक श्री. रमेश खरमाळे यांनी सपत्नी भौगोलिक, ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेल्या मौजे पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडास (बहादुरगड) नुकतीच भेट दिली.
किल्ले भेटी दरम्यान श्रीमंत राजेशिर्के घराण्याचे (महाराणी येसुबाई ) वंशज, गडदुर्ग संवर्धक श्री.लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी सुमारे १०० एकरावर विस्तारलेल्या किल्ले धर्मवीरगडावरील वास्तव इतिहासाची माहिती देत, छत्रपती शंभुराजांचे "शौर्यस्थळ", भीमा- सरस्वती संगम, विविध पुरातन मंदिरे व अनेक ऐतिहासिक वास्तु दाखवत, संबंधित वास्तुंची सविस्तर माहिती सांगितली, यावेळी गडकिल्ले प्रेमी, लेखक श्री. रमेश खरमाळे यांनी आपल्या परिने आपण नक्कीच किल्ल्यावरील इतिहासाचा प्रचार- प्रसार व विकास करण्याचा प्रयत्न करू असे बोलताना सांगितले. खरमाळे मेजर हे पक्षीमित्र ही असल्याने किल्ल्यात भटकंती करत असताना त्यांनी कॅमेरा व दुर्बिनीद्वारे पक्षी निरीक्षण केले. निरीक्षणात त्यांना किल्ल्यात काही दुर्मिळ पक्षी आढळले, म्हणून त्यांना पक्षांचे छायाचित्र काढण्याचा मोह आवरला नाही.
किल्ले भटकंती नंतर लक्ष्मीकांत राजे शिर्के यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. संपर्क कार्यालयात राजे शिर्के घराणे, राष्ट्रवादी माजी सैनिक सेल व गडकिल्ले, गडदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने रमेश खरमाळे व त्यांच्या पत्नी सौ.स्वाती खरमाळे, तसेच साजन भालचिम यांचा यथोच्छीत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रमेश खरमाळे यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक राजेशिर्के यांना भेट दिले, चर्चे दरम्यान बोलताना पर्यावरण विषयक, पाणी आडवा पाणी जिरवा, निसर्ग, पशुपक्षी व गडकिल्ले संवर्धन आदि विषयांवर अनमोल असे मार्गदर्शन केले, याप्रसंगी गडदुर्ग संवर्धक श्री.लक्ष्मीकांत राजे शिर्के, सचिव श्री.संपतराव राजे शिर्के, श्री.भागवत कळसकर आदि मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :