By : Polticalface Team ,03-10-2024
जन आधार न्युज पुणे : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीत काही लोक माझ्याकडून वेगळ्या गोष्टी वदवून घेण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केला. निसर्ग मंगल कार्यालयात बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांच्यासह त्यांच्या काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.
ते म्हणाले, कोरेगाव भीमाच्या संघर्षामध्ये काही जातिवादी प्रवृत्तींनी वेगळी भूमिका घेतली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात अस्वस्थता निर्माण झाली होती. राज्य सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची भूमिका घेतली. न्यायालयीन चौकशी सुरू झाली आणि एके दिवशी मला नोटीस आली. मला नोटीस यासाठी आली, की तुम्हाला समन्स काढले आहे. तुम्ही आयोगाच्या समोर हजर राहा. आयोग म्हणजे एका प्रकारचे न्यायालयच असते. या नोटिशीप्रमाणे मी चौकशीसाठी हजर राहिलो. या वेळी काही वकिलांनी माझी उलट तपासणी घेतली. त्यामध्ये मला अनेक प्रश्न विचारले गेले. माझी उलट तपासणी घेणाऱ्यांमध्ये फुले-आंबेडकर विचारांचे ॲड. राहुल मखरे हेदेखील होते. या प्रकरणात काही लोक माझ्याकडून काही वेगळ्या गोष्टी वदवून घेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, वस्तुस्थिती मला माहीत होती. निरपराध लोकांवर हल्ले झाले. जो स्तंभ, त्याचा इतिहास, ज्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या-धर्माच्या लोकांनी त्याग केला, प्राणांची आहुती दिली, हा इतिहास पुसण्याचे काम काही जातीय प्रवृत्ती करत होते. त्याच्याविरोधात आवाज उठविण्याचे काम आंबेडकरी विचारांच्या काही तरुणांनी करून वस्तुस्थिती, सत्य बाहेर आणले, त्यामध्ये मखरे हे होते.
वाचक क्रमांक :