By : Polticalface Team ,11-10-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे सद्यस्थितीला या रस्त्याचे खडीकरण करून मुरूम टाकला गेला परंतु हे काम अत्यंत मंदगतीने चालू असल्याने खडीकरण केलेले रस्त्याचे काम पुन्हा उदसले जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करून गती देण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांमधून केली जात आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट पर्यंत 1700 मीटरचे काम संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेले असून; जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून हे काम भक्कम व मजबुतीकरण करून करण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंत श्री होके यांनी दिली.
गेल्या दोन महिन्यापूर्वीच या रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला त्यामध्ये सद्यस्थितीला फक्त खडीकरण करण्यात आलेल्या असून; पुढे मात्र हे काम ठप्प झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रवासी व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांमध्येच साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होणार आहे. त्यातून ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने; सभासद; कामगारांची या रस्त्यातून मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत रस्त्याचे काम लवकर मार्गी लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे ऊस उत्पादक व प्रवाशांमधून बोलले जात आहे.
दरम्यान लिंपणगाव ते नागवडे कारखाना हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी हा रस्ता जिल्हा परिषदेकडे समाविष्ट करण्यात आला होता. परंतु जिल्हा परिषदेकडे रस्ता दुरुस्तीला निधी उपलब्ध नसल्याने अनेक वर्षापासून हा दळणवळणाच्या दृष्टीने नादुरुस्त रस्ता दुर्लक्षित राहिला होता. याबाबत वेळोवेळी नादुरुस्त रस्त्याची प्रसिद्धी देऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष देखील वेधण्यात आले होते. पत्रकार व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर सदर रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. यासाठी लिंपणगावचे ग्रामस्थ पत्रकार व स्थानिक कार्यकर्त्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून अखेर या रस्त्याला जवळपास दीड कोटी रुपये मंजुरी मिळाली. प्रवाशांचे म्हणण्यानुसार या महत्त्वाच्या रस्त्याची जागोजागी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या महत्त्वाच्या रस्त्याच्या मध्यभागी अक्षरशा दोन ते अडीच फूट खोल खड्डे पडल्याने रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यामध्ये हे प्रवासी व वाहनचालकांना समजावून येत नसल्याने रात्री ते अपरात्री या रस्त्यातून प्रवास करताना अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. त्यामध्ये काही अपघातग्रस्त प्रवाशांना अपंगत्व देखील आले. या नादुरुस्त रस्त्याची पूर्णतः वाताहत होऊन रस्त्याच्या दोन्हीही बाजूने काटेरी झाडांनी विळखा घातल्याने सरपटणारे प्राणी व चोरट्यांपासून प्रवासी व वाहनचालकांना प्रवास करताना मोठा धोका निर्माण झाला होता. आता या रस्त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये मंजूर झाल्याने रस्त्याचे काम सुरू झाले परंतु सदर रस्त्याचे काम अत्यंत मंद गतीने होत असल्याने खडीकरण केलेले काम पुन्हा उदअसले जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याच्या कामाकडे अधिक लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला योग्य त्या सूचना देण्यात याव्यात; सदर काम उत्कृष्टपणे डांबरीकरण करून मजबुतीकरण करण्यात यावे; अशी मागणी लिंपणगावचे ग्रामस्थ प्रवासी व वाहनचालकांमधून केली जात आहे.
या रस्त्याच्या प्रश्नसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री होके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की लिंपणगाव ते नागवडे कारखाना रस्त्याचे काम सुरू आहे परंतु वारंवार पाऊस पडत असल्याने कामासाठी अडथळा निर्माण होत आहे पावसाची उघडीप झाल्यास तात्काळ कामात सुरुवात करू याबाबत ठेकेदारालाही योग्य त्या सूचना देऊन सदर रस्त्याचे काम अधिक भक्कम कसे होईल यासाठी प्रयत्न करू व काम दर्जेदार होण्यासाठी स्वतः पाहणी करून लक्ष घालू
सार्वजनिक बांधकाम विभाग उपाभियंता श्री होके