By : Polticalface Team ,16-10-2024
जनआधार न्युज भिमसेन जाधव सोलापुर: सध्या उजनी धरण १११ टक्के भरले असून, धरणात १२३ टीएमसी पाणी आहे. ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून सोडलेले पाणी आता मंगळवारी (ता. १५) बंद केले जाणार आहे. १५ ऑक्टोबरला धरणात जेवढा साठा असेल, त्या पाण्याचे नियोजन करून आवर्तने निश्चित केली जातात. ऑक्टोबरअखेर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनांचा निर्णय होईल, पण १५ डिसेंबरनंतर शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे
उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले. याशिवाय दहिगाव, सीना-माढा उपसा सिंचन योजनांमधूनही पाणी सोडण्यास सुरवात झाली. धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील दररोज १६०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. आता केवळ कॅनॉलमधीलच पाणी सुरू असून, तेही आता १५ ऑक्टोबर रोजी बंद केले जाणार आहे. मागील अडीच महिन्यांपासून धरणातून पाणी सोडण्यात आले असून, समाधानकारक पाऊस झाल्याने ते पाणी नदीच्या दिशेनेच वाहून गेले.
आता पावसाळा संपल्याने धरणातून सोडले जाणारे सर्व पाणी बंद केले जाणार आहे. आगामी आठ महिन्यांचे पाण्याचे नियोजन आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत पहिल्या आवर्तनाचा निर्णय होईल. मार्च-एप्रिलमध्ये दुसरे तर आवश्यकतेनुसार मे महिन्यात शेवटचे आवर्तन सोडले जाऊ शकते. त्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत काही दिवसांतच होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.