By : Polticalface Team ,16-10-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील नुकसानग्रस्त शेतकरी श्री संतोष भिमाजी आल्हाट यांच्या गॅलन वांग्याचे पाऊस व वाऱ्याच्या प्रवाहामुळे छत उडून गेल्याने जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांच नुकसान झाले. ही घटना सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी घडली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा 16 ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रात सविस्तर प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले आणि 16 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वांग्याच्या बागेची पाहणी केली.
दरम्यान कृषी सहाय्यक केशव अनारसे व कामगार तलाठी अमोल कदम यांनी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट यांच्या गॅलन वांग्याच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी वांग्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. कृषी सहाय्यक अनारसे व कामगार तलाठी कदम यांनी संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य तो नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना अहवाल सादर करू असे आश्वासन यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.
दरम्यान दीड महिन्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकरी श्री संतोष आल्हाट यांच्या दोडका बागेचे मोठे नुकसान झाले या बागेच्या देखभालीसाठी त्यांना जवळपास सहा लाख रुपये खर्च आला. परंतु अचानक वादळ आणि वाऱ्याचा प्रवाहामुळे आता तोंडाशी आलेले उत्पन्न दोडका बागेवरील छत उडून गेले. त्यामुळे दोडका पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे. त्यावेळी देखील सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून तालुका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु त्यावेळी तालुका प्रशासनाने या नुकसानीचे गांभीर्य घेतले नाही. नुकसानीची माहिती तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आली होती परंतु या नुकसान ग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. किमान आता तरी श्री आल्हाट यांच्या गॅलन वांग्याच्या नुकसानीचा संबंधित कृषी सहाय्यक व कामगार तलाठी यांनी समक्ष पाहणी करून पंचनामा केला आहे. शासन स्तरावरून संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट यांना शासन नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी यावेळी संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट समवेत कृषी सहाय्यक केशव अनारसे; कामगार तलाठी अमोल कदम; सहाय्यक महसूल कर्मचारी श्री प्रकाश जाधव आदींनी गॅलन वांग्याच्या नुकसानीचा पंचनामा केला.