By : Polticalface Team ,22-10-2024
जनआधार न्युज भिमसेन जाधव :
ज्या इनोव्हा क्रिस्टा गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली ती गाडी सांगोला येथील व्यावसायिक अमोल नलावडे यांच्या नावावर आहे.
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
प्रशासनाने काल सायंकाळी मोठी कारवाई करत जवळपास पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोलनाक्यावर ही कारवाई करण्यात आली. ज्या इनोव्हा क्रिस्टा गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली ती गाडी सांगोला येथील व्यावसायिक अमोल नलावडे यांच्या नावावर आहे. मात्र ही गाडी मी जून महिन्यातच अकोला येथील बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकल्याचा दावा नलावडे यांनी केला आहे.
कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याने खळबळ उडाल्यानंतर इनोव्हा कारचे मालक अमोल नलावडे यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं आहे की, "मी जून २०२४ मध्ये माझी कार अकोला येथील बाळासाहेब आसबे यांना विकली आहे. त्यांनी कारची रक्कमही माझ्या बँक खात्यात जमा केली. परंतु कागदपत्रे त्यांच्या नावावर करायची राहून गेली असल्याने कारमालक म्हणून माझे नाव येत आहे. मात्र आता त्या गाडीशी किंवा त्यात सापडलेल्या पैशाशी माझा कसलाही संबंध नाही. त्या गाडीत कोण-कोण होतं, हेदेखील मला माहीत नाही," असा दावा नलावडे यांनी केला आहे.
दरम्यान, अमोल नलावडे यांनी जबाबदारी झटकली असली तरी जप्त करण्यात आलेली रक्कम नेमकी कोणाची आहे आणि कुठे नेली जात होती, याबाबतचा तपास करण्यासाठी पुढील काही दिवसांत पोलिसांकडून नलावडे यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
*रोहित पवारांचा निशाणा*
रोकड जप्तीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबाप्पू पाटील यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधत म्हटलं आहे की, "सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून २५-२५ कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार-झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत. लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ओके करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं," असं पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
वाचक क्रमांक :