By : Polticalface Team ,09-04-2025
नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड्च्या आवर्तनाचा निर्णय झाला. परंतु कुकडीच्या आवर्तनाचे काय? असा सवाल कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. उन्हाची तीव्रता अत्यंत भयानक असून; सूर्य दररोज मोठ्या प्रमाणावर आग ओकताना दिसत आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी हंगामातील उभी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड दिसून येत आहे. त्यामध्ये पिकांचे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील तितकाच गंभीर बनला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांचे व जनावरांचे भवितव्य देखील तितकेच धोक्यात येताना दिसत आहे. तर फळबागांची अवस्था देखील अतिशय चिंताजनक आहे. सद्यस्थितीला उन्हाच्या अति तीव्रतेमुळे विहिरीवर कुपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे तर आहे त्या पाण्यानचे देखील मोठ्या प्रमाणावर वेगाने बाष्पीभवन होत आहे. अशा परिस्थितीत श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी लाभ क्षेत्रात उन्हाळी हंगामातील आवर्तनाचे नियोजन अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे समजते. त्यामुळे कुकडी लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांच्या काळजाचे ठोके पाणीटंचाईमुळे वाढले गेले आहेत. तशा भावना देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान मागील महिन्यामध्ये कुकडी लाभ क्षेत्रात रब्बी हंगामाचे शेवटचे आवर्तन सोडले. परंतु शेतकऱ्यांचे फक्त पाटच ओले झाले. कुकडी लाभ क्षेत्रात प्रत्येक चाऱ्यांवर पाण्याचे खाजगी व्यक्तीकडे पाण्याचे हस्तांतरण केल्याने शेतकऱ्यांना मन मानेल पद्धतीने पाणी दिले जाते. त्यामध्ये 132 मायनर मध्ये फक्त सहा दिवसाचे आवर्तन सोडले. या आवर्तनातून शेवटच्या शेतकऱ्यांनी संघर्षाशी भूमिका घेतली. परंतु अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या भूमिकेला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नसल्याच्या प्रतिक्रिया देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. तशा भावना एक दिवशीय धरणे आंदोलनात व्यक्त होताना दिसल्या. त्यामध्ये काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी कुकडीच्या आवर्तनासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तात्काळ प्रस्ताव पाठवून आवर्तनाचा फेरविचार करू असे आश्वासन दिले त्यामध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी आंदोलन स्थळी सात दिवसात आवर्तन न सोडल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतु तरीदेखील अधिकाऱ्यांना या महत्त्वाचा पाणीप्रश्न बाबत गांभीर्य दिसून आले नाही. ही मोठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने शोकांतिका आहे.
आता उन्हाळी हंगाम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी यापूर्वीच उन्हाळी हंगामात दोन आवर्तन देण्याचे मान्य केले होते. उन्हाळी हंगाम मध्यावर येऊन ठेपलेला असताना उन्हाळी हंगामाचे कुकडीच्या आवर्तना संदर्भात अद्याप पर्यंत कालवा सल्लागार समितीने निर्णय घेतला नसल्याचे समजते. चालू वर्षी कुकडीची सर्व धरणे समाधानकारक भरलेली होती. मग या कुकडी धरणांचे पाणी नेमके गेले कुठे? असा सवाल देखील कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकरी सचिनराव कदम यांनी उपस्थित केला आहे. सद्यस्थितीला कुकडी धरणातील पाण्याची अवस्था अत्यंत चिंताजनक दिसून येत आहे. धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे डिंभे 27%; येडगाव 20%; माणिक डोह ६ टक्के; वडज 33%; पिंपळगाव जोगा 15% अशाप्रकारे धरणांमध्ये पाणीसाठा आजच्या स्थितीला दिसून येत आहे. मग अधिकारी कुकडी लाभक्षेत्रात उन्हाळी हंगामाचे आवर्तन कशाप्रकारे करतात याकडे मात्र शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. वास्तविक पाहता कुकडी लाभ क्षेत्रात एका आवर्तनासाठी दीड टीएमसी पाणी लागते. त्यामध्ये डिंभे धरणातून दीड टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडल्यास निश्चितपणे उन्हाळी हंगामाचे एक आवर्तन यशस्वी होऊ शकते. असे नागवडे कारखान्याचे माजी संचालक सचिनराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या प्रश्नासंदर्भात श्री कदम यांनी आणखी पुढे म्हटले आहे की; येडगाव धरणामध्ये पाणीसाठा अपुरा असला तरी मात्र डिंबेतून आतापासूनच दीड टीएमसी पाण्याचे येडगाव धरणात फीडिंग सुरू करण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणे उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन यशस्वी होऊ शकते. मात्र कालवा सल्लागार समितीने या संदर्भात उन्हाची तीव्रता लक्षात घेता लवकरात लवकर कुकडीच्या आवर्तनाचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा पिके जळाल्यानंतर आवर्तन जर सोडले तर शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान होऊ शकते. शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू शकतो. यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी देखील कुकडीच्या आवर्तनासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत वरिष्ठ पातळीवर आवर्तना संदर्भात आवाज उठवण्याची आवश्यकता असल्याचे नागवडे कारखान्याचे माजी संचालक सचिनराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान रब्बी हंगामात आवर्तनात जो शेतकऱ्यांवर अन्याय झाला. तो मात्र आता उन्हाळी हंगामात होता कामा नये. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. याची जाणीव संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घेण्याची गरज आहे. कारण पाणी उशाला मात्र कोरड घशाला अशा संकटातून पूर्वपारपासून श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी संयमाने पाण्यासाठी संघर्ष व आंदोलने करत आहेत. आवर्तन बाबत शेतकऱ्यांच्या जीवनाशी कोणीही संकटे आणू नयेत. अशी माफक अपेक्षा देखील कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर उन्हाळी हंगामाचे कुकडीच्या आवर्तनाचा निर्णय घेऊन आवर्तन लवकरात लवकर पूर्ववत करावे अशी मागणी देखील कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
वाचक क्रमांक :