पत्रकार कुरुमकर यांनी शैक्षणिक क्षेत्राला अधिक बळ दिले -मुख्याध्यापक हौसराव दांगडे
By : Polticalface Team ,17-04-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी गुणवंत विद्यार्थी; शिक्षक; तसेच तालुक्यातील प्रत्येक विद्यालयांचे विविध उपक्रमांना सुयोग्या अशी प्रसिद्धी देऊन शैक्षणिक क्षेत्राला प्रसिद्धीच्या माध्यमातून अधिक बळ दिले. असे गौरवोद्गार न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव चे मुख्याध्यापक हौसराव दांगडे यांनी काढले.
पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना राष्ट्र सह्याद्री समूहाने नुकताच अहमदनगर येथे उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार म्हणून पुरस्कृत केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव या विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक हौसराव दांगडे यांनी कुरुमकर यांचा यथोचित असा सन्मान केला.
यावेळी आपल्या गौरवोदगारपर भाषणात मुख्याध्यापक दांगडे पुढे म्हणाले की; कुरुमकर हे शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील एक चमकणारा तारा आहे त्यांनी आपल्या पत्रकारितेतून अनेकांना प्रकाशमय केले. 27 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये प्रत्येक क्षेत्रात अगदी बारकाईने लिखाण करून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका प्रशांसनीय आहे. असे सांगून श्री दांगडे पुढे म्हणाले की; पत्रकार कुरुमकर यांच्याशी ज्या ज्या व्यक्तींचा संपर्क आला. त्यांच्याशी त्यांनी उत्तम प्रकारे मैत्री जोडली. मैत्रीतून त्यांनी ऋणानुबंधाचे नाते जोडत अनेकांची मनेही जिंकली. जिथे अन्याय तिथे त्यांची लेखणी अगदी सडेतोडपणे असते. असे सांगून श्री दांगडे यांनी पत्रकार कुरुमकर यांना पुढील कार्यास शभेच्छा व्यक्त केल्या.
या सन्मान सोहळ्यासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे; उपशिक्षक अंकुश कोकाटे; शंकर येदलोड; दादासाहेब शिरोळे; गणेश इंगळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :