सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची सतरा वर्षानंतर गळाभेट!
By : Polticalface Team ,18-04-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या सन 2007 -08 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जेष्ठ माजी शिक्षक ईश्वर रेवगे सर हे होते.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर जगताप; ज्येष्ठ शिक्षक रवींद्र भोंडवे; राजेंद्र गारुडकर; शिवाजी नागवडे; श्रीमती गायकवाड; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे बापू; सचिव व्हि. डी. जगताप; दिवंगत मुख्याध्यापक कैलास लगड आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी स्वागत करून सन्मान केला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक रवींद्र भोंडवे यावेळी म्हणाले की; सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय सन 1992 रोजी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. संस्थेचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू व संस्थेचे सचिव दिवंगत व्हि डी जगताप यांनी दूरदृष्टी ठेवून विनाअनुदानित्वावर या माध्यमिक विद्यालयाची उभारणी केली. या कामी गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व दिवंगत बापूं अण्णा कुरुमकर; माजी सरपंच रामभाऊ भोईटे; माजी सरपंच बापूराव रेवगे आदींनी या कामी मौलिक सहकारी केले. त्यातून गावातच गोरगरीब विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर शिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांनी देखील उच्चांकी निकालात विद्यालयाचा नवलौकिक वाढवल्याचे सांगितले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर जगताप यावेळी म्हणाले की; विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल सतरा वर्षानंतर एकत्र येऊन जुन्या शालेय स्तरावरील आठवणींना उजाळा दिला. जीवन हे धक्काधक्कीचे बनले आहे. अशा परिस्थितीत एकत्र येऊन माजी विद्यार्थ्यांनी आनंद द्विगुणित केला. असे सांगून जगताप पुढे म्हणाले की; एकत्र आल्याने एकमेकांचे सुखदुःख समजून घेता येते. संकटकाळी एकमेकांना मदत देखील होते. त्यातून चांगला संदेश समाजासमोर जातो. यापुढेही असेच एकमेकांच्या संपर्कात रहा; आनंदी राहा; हसत रहा; सुखी रहा; उत्तम प्रकारे जीवन जगा मात्र ज्ञानमंदिराला यापुढे विसरता कामा नये. असे सांगून श्री जगताप यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाची माजी विद्यार्थिनी तनुजा कुरुमकर; पूजा होळकर; सागर हांडे; अमित खळकर आदींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तर ज्येष्ठ शिक्षक ईश्वर रेवगे; राजेंद्र गारुडकर यांनी 207- 08 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचे विद्यार्थी गुणी व आज्ञाधारक होते. या सर्वांची प्रगती पाहून शिक्षक गहिवरून येत निश्चितपणे तुमच्या बॅचची आठवण आमच्या सतत स्मरणात राहील असे सांगून पुढील भावी आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना रेवगे व गारुडकर यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
मेळावा यशस्वी करण्यासाठी सागर हांडे; गणेश ठोमस्कर किरण भोंडवे; अमित खळतकर; प्रकाश शेलार; गणेश मुंढेकर आदींनी मोठे परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. सोनटक्के सर यांनी केले. तर आभार गणेश ठोमस्कर यांनी मानले.
वाचक क्रमांक :