वांगदरी गावात बिबट्याचे वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे पलायन !वांगदरी येथील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा आरोप
By : Polticalface Team ,27-04-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आलेल्या अधिकारी व वन कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याने धूम ठोकली. असा आरोप वांगदरी गावच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे वांगदरी व इनामगाव परिसरात ग्रामस्थ शेतकरी शेतमजूर यांच्यामध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वांगदरी येथील पोपट किसन राऊत यांच्या शेत जमीन गट नंबर 16 येथील शेतातील पाण्याच्या सिमेंटी पाईपमध्ये दबी धरून बिबट्याचा मुक्काम या क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिसून आला. याबाबत संबंधित शेतकऱ्याने गावातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह गावातील जवळपास 250 ते 300 ग्रामस्थांचा जमाव जमला. गावातील काही कार्यकर्त्यांनी तात्काळ श्रीगोंद्याच्या वनविभाग अधिकाऱ्यांना बिबट्याची इत्यंभूत माहिती दिली. तर काही कार्यकर्त्यांनी नागवडे कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ शिरूर येथील रेक्सोटींमला बिबट्याच्या वास्तव्याची कल्पना दिली. रेकसोटीम व श्रीगोंद्याचे वनाधिकारी व कर्मचारी या बिबट्याच्या घटनास्थळी काही वेळाने दाखल झाले. वनाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा पाईपच्या एका तोंडातून लावला. बिबट्या सावध झाला आणि दुसऱ्या पाईपच्या तोंडातून त्याने धूम ठोकत इनामगावच्या दिशेने पलायन केले. वांगदरी गावच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या बाजूने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जाळी लावली असती तर बिबट्या निश्चितच जेरबंद झाला असता. परंतु वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठा हलगर्जीपणा केल्यामुळे बिबट्याची सुटका झाल्याचा आरोप वांगदरी गावच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इनामगाव नलगे मळा कौलवस्ती येथील एका वृद्ध महिलेवर दोन दिवसापूर्वी रात्री हल्ला करून बळी घेतला. आता बिबट्याने इनामगाव परिसरात वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोरून पलायन केल्यामुळे इनामगाव व वांगदरी गावच्या ग्रामस्थांमधून काळजाचे ठोके मात्र आता वाढू लागले असून; या परिसरात बिबट्याची दहशत मात्र कायम आहे. दरम्यान इनामगाव वांगदरी च्या सरहद्दीवर घोड नदी असल्याने बिबट्यांना भक्षण केल्यानंतर पाण्याची देखील सोय आहे. त्याबरोबरच या नदीकाठावर काटेरी झाडे अधिक असल्यामुळे त्याला दडण्यासाठी जागा ही मोठी आहे. इनामगाव वांगदरी ही गावे सिंचन क्षेत्रात असल्याने उसाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्यांची संख्या देखील जास्त असण्याची शक्यता वांगदरी च्या कार्यकर्त्यांनी सांगितले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आता या बिबट्यांचा कशाप्रकारे शोध घेतात व जेरबंद करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून केवळ वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच बिबट्याने धूम ठोकल्याचा आरोप देखील वांगदरीच्या कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.
वाचक क्रमांक :