हंगेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
By : Polticalface Team ,13-05-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील श्री हंगेश्वर विद्यालय, हंगेवाडी येथे 1998 च्या एस.एस.सी. बॅचचे स्नेहसंमेलन रविवार, दि. 11 मे 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. तब्बल 27 वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांबरोबरचे बंध अधिक घट्ट केले.
या स्नेहसंमेलनात शालेय जीवनातील गमती-जमती, शिक्षकांचे मार्गदर्शन, परीक्षा काळातील आठवणी आदींचा मनमोकळा आविष्कार झाला. 27 वर्षांनंतर पुन्हा भेट झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी या कालावधीत शिक्षण, व्यवसाय, नोकरी, शेती आणि समाजकारण क्षेत्रात घेतलेल्या अनुभवांचे कथन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कळसकर सर होते. त्यांनी आपल्या भाषणात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या यशाचा गौरव केला. विशेष पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अध्यापक चिखले सर आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्नेहसंमेलनाला 40 हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन 1998 च्या बॅचमधील उत्साही विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. हनुमंत शिंदे आणि आभार प्रदर्शन राम रायकर सर या माजी विद्यार्थ्यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेतील सुसंस्कारित सोहळा सर्वांच्या मनात कोरला गेला.
वाचक क्रमांक :