By : Polticalface Team ,09-06-2025
जन आधार न्युज भिमसेन जाधव बारामती दि. ९ जून २०२५ बारामती नगर परिषदेच्या अंतर्गत अंत्यविधीसाठी असलेली वाहने अत्यंत दयनीय स्थितीत असून, ती नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजांनुसार कार्यक्षम राहिलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मंगलदास तुकाराम निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बारामती ही विकासाच्या दृष्टीनं देशभरात एक आदर्श म्हणून ओळखली जाते. मात्र, अंत्यविधीसारख्या मूलभूत आणि मानवी गरजांमध्ये गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. नगर परिषदेचे अंत्यविधी वाहन अत्यंत जीर्ण, धोकादायक आणि अकार्यक्षम स्थितीत आहे. या वाहनाचे टायर पंचर होणे, रंग उडणे, इंजिन बंद पडणे अशा अनेक समस्या वारंवार येत आहेत.
मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहन वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे गरिब, वंचित समाजातील कुटुंबीयांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होते. या मुद्द्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे निकाळजे यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन युवा आघाडीने पुढील मागण्या मांडल्या आहेत:
1. अंत्यविधीसाठी नवीन व सुस्थितीत वाहन तातडीने उपलब्ध करून द्यावे.
2. वाहन वेळेवर व विनाअडथळा उपलब्ध व्हावे यासाठी शासकीय नियोजन करावे.
3. अंत्यविधी सेवा हे सामाजिक उत्तरदायित्व मानून नगरपरिषदेनं कायमस्वरूपी व्यवस्थापन करावे.
या मागण्यांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास, जनआंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
सदर निवेदनावर महासचिव प्रतिक चव्हाण, सहसचिव कृष्णा साळुंखे, आदींच्या सह्या असून, यासोबतच दुरवस्थेतील वाहनाचा फोटोही जोडण्यात आला आहे.
वाचक क्रमांक :