छत्रपती महाविद्यालयात दोन दिवशीय कॅम्पस मुलाखतींचे आयोजन!
By : Polticalface Team ,16-06-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी )श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलमार्फत कॉलेज कॅम्पसमध्येच दोन दिवशीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दोन दिवस मुंबई, रांजणगाव (पुणे), सुपा MIDC मधील एकूण ५ कंपन्यांचे अधिकारी मुलाखती घेण्याकरता उपस्थित राहणार आहेत. लेखी परीक्षा आणि मुलाखती मधून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
फक्त डिग्री देण्यापुरती ही संस्था नसून विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळवून देणारी ही अमृतवाहिनी झाली पाहिजे, या स्व.बापूंच्या विचाराने प्रेरित होऊन आदरणीय राजेंद्र (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम सुरू आहेत. कॉलेजचा प्लेसमेंट विभाग २५ पेक्षा जास्त कंपनी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून २० पेक्षा जास्त कंपन्यांसोबत सामंजस्य करार संपन्न झाले आहेत.
शुक्रवार दि. २० जून २०२५ रोजी पदवी धारकांसाठी रांजणगाव (पुणे) येथील हाएर ॲपलियनसेस इंडिया लि., फियाट इंडिया ऑटोमोबाईल आणि सुपा येथील यु.के.बी. इलेक्ट्रॉनिक्स व मिडीआ इंडिया लि. तसेच सोमवार दि. २३ जून २०२५ रोजी मुंबई येथील एडवेंट केंबिओ प्रा.लि. या कंपनी मधील रिक्त जागांसाठी एम.एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री मधील विद्यार्थ्यांकरता मुलाखती होणार असल्याची माहिती कॉलेजच्या प्राचार्यांनी दिली.
या मुलाखतीसाठी पदवी उत्तीर्ण तसेच शैक्षणिक २०२४-२५ मध्ये अंतिम वर्षातील पदवी परीक्षा दिलेले कला,विज्ञान, वाणिज्य, आय.टी.आय. व संगणक शाखेचे विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्याकरता महाविद्यालयास संपर्क करून सध्या ऑनलाईन नावनोंदणी करावी तसेच वरील तारखेस सकाळी ठीक ९ वाजता मूळ कागदपत्रांसोबत महाविद्यालयात उपस्थित राहून प्रत्यक्ष नावनोंदणी करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे सर्व विश्वस्त,निरीक्षक व प्राचार्य यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :