स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By : Polticalface Team ,06-07-2025
भिमसेन जाधव
प्रतिनिधी इंदापूर
दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलांच्या गळ्याला कोयता लावून सोन्याचे दागिने लुटून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
३० जूनच्या पहाटे स्वामी चिंचोली येथे चहा टपरीवर चहा प्यायला थांबलेल्या वारकरी महिलांना दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील तब्बल दिड लाख किंमतीचे सोन्याचे दागिने लुटले होते. यावरच न थांबता या नराधमांनी त्यांच्यातील एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून फरफटत नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे दौंडसह राज्यात तीव्र पडसाद उमटले होते.पावसाळी अधिवेशनातही या घटनेची दखल घेण्यात आली होती. या घटनेला पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला होता. या नराधमांना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दहा पोलिसांची विविध पथके शोध घेण्यासाठी नेमली होती. काही दिवसापूर्वी संशयित आरोपींचे रेखाचित्र ही पोलिसांनी प्रसिद्ध केले होते. घटना घडल्यापासून पुणे ग्रामीण पोलीस या नराधमांचा शोध घेत होते.अखेर पाच दिवसानंतर पुणे पोलिसांना दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नसली, तरी दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
वाचक क्रमांक :