अवधुत राऊत यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याने खळबळ.
दौंड येथील घटना ; एका दिवसात जामीनावर सुटका!
By : Polticalface Team ,Thu Feb 10 2022 19:35:41 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदे तालुक्यातील माध्यम प्रवर्तक अवधुत राऊत यांच्यावरती दौंड पोलिसांनी शासकीय कामात अडथळा तसेच पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ नुसार मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली. गुन्हा दाखल होताच त्यांना ताब्यातही घेण्यात आले.
अवधुत राऊत हे गेल्या काही दिवसांपासून एका राजकीय कारणाने श्रीगोंदा तालुक्यातुन प्रचंड चर्चेत आले आहेत. तालुक्यातील सर्वच नेत्यांच्या बरोबरीने ते सातत्याने दिसून येत होते. त्यांची एकंदरीत पार्श्वभूमी पाहता ते असा काही गुन्हा करतील असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया देखील उमटली.
दौंड येथे नाका बंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांना अरेरावीची भाषा केल्याने हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हा गुन्हा दाखल होणार हे माहिती असताना सुद्धा राऊत यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्या नंतर अनेक सूत्रे हलली. त्यानुसार सदर कलमे लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण अवघ्या एका दिवसात अवधुत राऊत यांचा जामीन मंजूर करत दौंड न्यायालयाने राऊत यांची सुटका केली.
या गुन्ह्याची बातमी श्रीगोंदा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली होती. याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. जामीनानंतर न्यायालयाच्या आवारात त्यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत याविषयी बोलण्यास नकार दिला.
चौकट :
राज्यातील बड्या नेत्याने केली राऊत यांची पाठराखण.
दौंड येथील ही घटना घडल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील काही बड्या नेत्यांनी दौंड पोलिसांना हा दाखल करण्यापासून रोखण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण याला यश आले नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र राज्यातील महत्वपूर्ण पदावर काम करत असलेल्या एका दादा व्यक्तीने अवधुत राऊत यांची पाठराखण केल्याची चर्चा दौंड परिसरात चालू होती.
वाचक क्रमांक :