प्रनोती च्या वाटचालीला हळदी कुंकवाचा गंध.
डॉ.प्रनोती जगताप ठरणार राहुल जगताप यांच्या राजकीय सूत्रधार!
By : Polticalface Team ,Mon Feb 14 2022 12:59:15 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदे, : माजी आमदार राहुल जगताप यांच्या सौभाग्यवती डॉ.प्रनोती जगताप राजकिय क्षेत्रात सध्या सक्रीय राहत वेग धारण केला आहे. कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप
कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या पट्ट्यातील कोळगाव, येळपणे, बेलवडी ,मांडवगण व श्रीगोंदे शहर या गटात त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना हळदीकुंकू केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. त्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवडून जात डॉ. प्रनोती यांचा राजकीय श्रीगणेशा झाला.
निवडणूक झाल्या नंतर सभासदांना प्रेमाची भेट देण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना साड्या वाटण्याचा उपक्रम हाती घेतलेला. तद्नंतर आता संक्रांतीचा बेत आखत त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला महिला वर्गातून मोठया प्रमाणात दाद मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्या लवकरच तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होणार की काय या चर्चेला उधाण आले आहे.
कौटुंबिक कारणाने त्यांचा दौरा सुरू असला तरी या मागे राजकीय गंध असल्याचे जाणवते. राहुल जगताप यांच्या राजकारणाची सूत्रे हाती घेत डॉ.प्रनोती या त्यांच्या मागील राजकीय सूत्रधार ठरतील अशी संभावना व्यक्त होत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने ही सगळी तयारी चालू असल्याचे जगताप समर्थकांचे म्हणणे आहे. याला वेळ असला तरी आपल्या वाटचालीला हळदी कुंकवाचा गंध देण्याचे काम प्रनोती यांच्याकडून लिलया सुरू आहे.
चौकट : दोन वहिनी एका मैदानात.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जगताप व नागवडे गट सक्रिय झाल्याचे जाणवत आहे. कुकडी बिनविरोध झाल्यानंतर डॉ.प्रनोती यांनी विविध संकल्पना राबवत लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. नागवडे कारखान्याच्या निवडणूकीत सक्रिय असलेल्या अनुराधा नागवडे मात्र निवडणूकी नंतर थोड्याशा अलिप्त झाल्याचे दिसत बाजूला पडल्या आहेत.
वाचक क्रमांक :