By : Polticalface Team ,12-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे):
यंदाच्या उन्हाळ्यात १९ एप्रिलला ४०.६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेल्यानंतर बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील दुसऱ्यांदा जास्तीचे तापमान नाेंदविले गेले. पारा ४०.२ अंश सेल्सिअसवर गेला.
सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. दुपारी एकदम कडक ऊन होते. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ऊन व उकाडा कायम होता. तापमान वाढल्यामुळे दुपारी १२ ते सायंकाळपर्यंत रस्ते निर्मनुष्य होते. चिकलठाणा वेधशाळेने यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची दुसऱ्यांदा नोंद घेतली. हवेतील आर्द्रता ३४ टक्क्यांच्या आसपास होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पारा चढला. तिसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे पारा घसरला. मे महिन्यात पुन्हा तापमान वाढत आहे. दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी १५ मेपर्यंत तापमान वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे.
का वाढते आहे तापमान?
१५ मे पर्यंत तापमान वाढेल. मोचा चक्रीवादळामुळे हवेतील बाष्प त्या दिशेने ओढले जाऊन हवेतील आर्द्रता वाढते आहे. त्यामुळे तापमान वाढत आहे. आगामी पाच दिवसांत हे प्रमाण वाढेल. त्याचा परिणाम नियमित मान्सूनवर देखील होईल.
-श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ
मागील चार दिवसांतील तापमान
७ मे : ३४.६ अंश सेल्सिअस
८ मे : ३८.०
९ मे : ३९.२
१० मे : ४०.२ अंश सेल्सिअस