By : Polticalface Team ,15-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
आई-वडील हैदराबादला गेल्यामुळे आजी-आजोबांकडे आलेल्या १३ वर्षाच्या मुलाचे डोके तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टने खाली येताना लिफ्टमध्ये अडकले. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कटकट गेट परिसरातील हयात हॉस्पीटलच्या पाठीमागील इमारतीत रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
साकिब सिद्दीकी इरफान सिद्दीकी (१३, रा. शहाबाजार) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकिबचे वडील टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात नोकरीला आहेत. त्याचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. कामानिमित्त साकीबचे आई-वडील हैदराबादला गेले आहेत. त्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा साकिबला आजी-आजोबाकडे सोडले होते. त्याला दोन बहिणी असून, तो नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. रात्री तो लिफ्टमध्ये इतर मुलांसोबत खेळत होता. त्याने खेळता खेळता लिफ्ट सुरू केली आणि डोके बाहेर काढले. काही समजण्याच्या आतच त्याचे डोके लिफ्टमध्ये आडकले. यात त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे इमारतीमध्ये एकच गोंधळ उडाली. त्याला मदत करण्याचीही संधी कोणाला मिळाली नाही. जिन्सी पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर कर्तव्यावरील अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला. तसेच पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.