By : Polticalface Team ,05-10-2024
मराठी विशेष :गेली अनेक वर्षे महाराष्ट्र दिन किंवा मराठी भाषा दिन आला की एक प्रश्न असायचा की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार. भारतात आत्ताच्या घडीला ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तामिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४). गेली किमान ९ वर्षं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून जोरदार मागण्या, चर्चा आणि प्रसंगी वाद होत आहेत. अलीकडे संसदेतही ते बऱ्याच वेळा पाहायला मिळालं. काही मराठी लोकप्रतिनिधींनी लोकसभा आणि राज्यसभा येथे प्रश्न उपस्थित केले. तेव्हा The proposal of Marathi is under active consideration, असे सांगण्यात आले. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने २००५ साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. एखादया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही निकष असतात ते पूर्ण करावे लागतात.
१) भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे १५००-२००० वर्षं जुना हवा.
२) अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. काळाच्या ओघात भाषा बदलली असेल पण तिचा गाभा ,चौकट बदलता कामा नये. वेगवेगळ्या काळात भाषेची संपूर्ण वेगळी रूपे असू नयेत.
३) प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं. भाषेतील साहित्य अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे असावे.दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
४) इतर भाषांचा प्रभाव चालेल, पण ती स्वतंत्र भाषा असावी.
मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदावर असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी १० जानेवारी २०१२ रोजी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती गठीत केली. या समितीने ४३५ पानांचा एक अहवाल तयार केला गेला. १२ जुलै २०१३ अहवाल केंद्राकडे गेला.
महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ११ कोटी लोकांची मराठी जगातली १०व्या ते १५व्या क्रमांकाची भाषा आहे. देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. एक हजारांवर ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट आदींचा संदर्भ देत मराठीचे अभिजातपण सिद्ध केलेले आहे. उदाहरणार्थ मूळ विदर्भातील वाशीमच्या असलेल्या गुणाढ्य नावाच्या व्यक्तीने पंजाबात जाऊन बृहत्कथा हा ग्रंथ पैशाची या प्राकृत भाषेत लिहिला. दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेल्या या ग्रंथात अनेक प्रकरणे मराठी भाषेतील आहेत. तसेच श्रीलंकेत दोन हजार वर्षापूर्वी दीपवंश आणि महावंश हे दोन ग्रंथ लिहिले गेले त्यात अनेक मराठी भाषकांचा उल्लेख आहे.तर विनयपिटक या अडीच हजार वर्षापूर्वी उत्तर भारतात लिहीलेल्या बौद्ध ग्रंथात महाराष्ट्र हा प्रदेश वाचक उल्लेख आहे. लीळाचरित्र , ज्ञानेश्वरी , विवेकसिंधू यांसारख्या ग्रंथांचा आधार देऊन ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे.
विशेषतः समितीचे निमंत्रक श्री.हरी नरके यांनी महाराष्ट्रभर हिंडून या संबंधाने शेकडो व्याख्याने दिली आणि लोकजागृती करण्याचा मनापासून प्रयत्न केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दरबारी आपले वजन वापरले. तसेच महाराष्ट्रातील मराठी खासदार,आमदार लोकप्रतिनिधी यांनी याचा केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच माध्यमांनी हा प्रश्न उचलून व लावून धरला. सर्वांनी आपली नैतिक जबाबदारी मानून मेहनत घेतली कारण शेवटी हा मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. अखेर ३ ऑक्टोबर २०२४ हा दिवस मराठी भाषेसाठी ऐतिहासिक ठरला आहे. आपल्या माय मराठीला अभिजात भाषा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी खूप फायदे आहेत.
१) भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान.
२) भाषा भवन उभारणे.
३) मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं.
४) भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं.
५) प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं.
६) महाराष्ट्रातील सर्व १२,००० ग्रंथालयांना सशक्त करणं.
७) मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं
८) ग्रंथ व साहित्याचा प्रसार व ग्रंथालये उभारणे,
९) देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ.
हा सन्मान म्हणजे मराठी भाषेच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव आहे, ज्याचा आपल्या देशाच्या इतिहासात मोलाचा वाटा आहे. तमाम मराठी भाषिकांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
वाचक क्रमांक :